दुर्मिळ वनस्पतींची माहिती बोर्टनिकल गार्डन



देशभरातील पामच्या ११० प्रजाती, परातीपेक्षा भले मोठे व्हिक्टोरिया अॅमेझॉनिकेचे पान आणि पश्चिम घाटातील दुर्मिळ आणि लोप पावत चाललेल्या शंभरहून अधिक प्रजाती असलेल्या वनस्पतीशी कोल्हापूरच्या पर्यावरणप्रेमीनी महाराष्ट्र टाइम्सच्या मटा नेचरवॉकद्वारे संवाद साधला. दुर्मिळ वनस्पतीबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्सुकता दाखवली. पृथ्वीरक्षण करण्यासाठी प्रत्येक झाड आणि रोपांचे संवर्धन करण्याचा निर्धार सहभागी पर्यावरणप्रेमींनी केला.
शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी विभागाने तब्बल तीस वर्ष परिश्रम करुन जिद्दीने बोर्टनिकल गार्डनची उभारणी केली आहे. केंद्रीय मंत्रालयाने भारतातील लीड बोर्टनिकल गार्डन म्हणून मान्यता दिली असून १२०० हून अधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत. मटाने आज सोमवारी सकाळी नेचर वॉकच्या माध्यमातून ही गार्डन पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विवेकानंद, गोखले, न्यू कॉलेजसह ज्येष्ठ नागरिक, तरुण, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. अनेक सहकुटुंबे लहान मुलासह नेचर वॉकमध्ये आले होते. बॉटनी विभागप्रमुख वर्षा जाधव (राठोड) यांनी उपस्थित सहभागी पर्यावरणप्रेमींचे स्वागत करुन बोर्टनिकल गार्डनची माहिती दिली. ४५ एकर बागेत कोणत्या दुर्मिळ वनस्पती आहेत यांची माहिती दिली. त्यानंतर या विभागातील अभ्यासक, विद्यार्थ्यांनी सहा गटात सहभागी नागरिकांची विभागणी करुन गार्डनची सैर घडवली.
पाम विभागातील अर्ध सुपारी, फॉक्स टेल, बिस्मार्क यासह अनेक प्रजातींची माहिती दिली. शंभर वर्ष जगणारा सेंचुरी पाम पाहण्यासाठी सर्वांचा गराडा पडला होता. पामचे फायदे, पाम पासून तेलाची निर्मिती यांची माहिती देण्यात आली. माहिती देत असताना अभ्यास विद्यार्थी वहीमध्ये नोटस् घेत होते. अनेकजण मोबाईलवर झाडांचे फोटो शूट करत होते. खारफुटी मॅग्रोव्ह विभागातील रोपांची माहिती घेण्यात अनेकजणांनी उत्सुकता दाखवली. उंडी या वनस्पतीपासून तयार केलेले तेलाचा वापर पणती आणि समई प्रज्वलीत करण्यासाठी केला तर काजळी धरत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या वृक्षांच्या संशोधनाकडे तेल कंपन्या जास्त लक्ष देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पश्चिम घाटातील कॅन्सर उपचारासाठी वापरली जाणारी नरक्या, नोनी, सुंदरी या झाडांची तर चामखीळावरील मलम तयार करण्यासाठी मयूर शिरवा वनस्पतीचा वापर केला जातो. तसेच धूप वनस्पतीच्या डिंकापासून धूप तयार केला जातो अशी माहिती यावेळी देण्यात आली.
टिश्यू कल्चर विभागात केळीची गोवा मंडल आणि जी नाईन या प्रजातीच्या रोपांची माहिती देण्यात आली. अनेकांनी केळीची रोपे खरेदी केली. पचोली, गुलाबी मिरी या वनस्पतीतील फुलांचा वापर पयफ्युमसाठी केला जात असल्याची माहिती देण्यात आली. व्हिक्टोरिया अॅमेझॉनिका ही वनस्पती नेचर वॉकमधील प्रमुख आकर्षण होती. परातीपेक्षा मोठे असलेले पान पाण्यावर तरंगते. या पानावर वीस ते तीस किलो वजनाची वस्तू ठेवली तरी पान पेलते अशी माहिती देण्यात आली. दोन तास चाललेल्या नेचर वॉकमध्ये सहभागी व्यक्तींना त्यांच्या ज्ञानात मोठी भर पडल्याचे सांगितले. या उपक्रमाला प्रा. एस.एस.कांबळे, प्रा. डी.के.गायकवाड, प्रा. एन.बी.गायकवाड, डॉ. आर.व्ही.गुरव, प्रा. एस.जी घाणे, डॉ. एम.एम. लेखक, डॉ. स्वरुपा पाटील, डॉ. कल्याणी पवार, डॉ. एम.एस. निंबाळकर, डॉ.अहिल्या वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
००००००
प्रा. डॉ. यादवांनी दिली दुर्मिळ वनस्पतींची माहिती
डॉ. एस.आर. यादव यांनी नेचर वॉक संपल्यानंतर विभागातील मधुबन या सभागृहात पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती, त्यांचे महत्व, संवर्धन यांची माहिती दिली. शिवाजी विद्यापीठाची लिड बोर्टनिकल गार्डनही देशातील सर्वोत्तम असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या विभागाचे नाव झाले आहे. या विभागाची प्रसिद्धी मिळावी हा आमचा हेतू नसून पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतीचे जतन आणि संवर्धन करणे हा आमचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या पर्यावरणासाठी प्रत्येकाने उपयुक्त, औषधी, दुर्मिळ वृक्ष लावून जोपासना करावी, असे आवाहन केले.
"इतक्या प्रमाणात वनस्पतीतील वैविध्यता आम्ही ह्याआधी कधीही पाहिली नव्हती. ती पाहण्याची संधी आम्हाला नेचर वॉकमुळे मिळाली. ह्या उपक्रमाचं नियोजन उत्तम असून
अभ्यासकांबरोबरच सामान्य जनांसाठीही हा उपक्रम उपयोगी ठरला असेल ह्याची खात्री वाटेत."
अनिकेत सणगर, गोखले कॉलेज. (विद्यार्थी)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Special Type of Inflorescence: Cyathium